घर घ्या तरुण वयातच!

राग वामदत्त posiview.response@esakal.com

'एक महल हो सपनोंका' हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. हे घर शक्‍य तितक्‍या लवकर घेणं अनेक दृष्टींनी फायद्याचं ठरत असतं. तरुण वयात घर घेण्यानं काय काय फायदे होऊ शकतात, यावर एक नजर.

तुम्ही नोकरीला लागलात आणि हातात पैसा खुळखुळायला लागला, की कार, एलसीडी, महागडा मोबाईल फोन, लॅपटॉप अशा गोष्टी घ्यायला "टेंप्ट' होणं साहजिक आहे. पण एक लक्षात घ्या, या वस्तू म्हणजे "डेप्रिशिएटिंग ऍसेट्‌स' आहेत. म्हणजे त्यांचं मूल्य हे सतत कमीच होत असतं. तुम्ही या वस्तू घेऊन दुकानातून बाहेर पडता, तेव्हाच त्यांचं मूल्य वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांनी कमी झालेलं. घराचं मूल्य मात्र दिवसेंदिवस वाढतच जातं. थोड्या काळाचा विचार केला तर घरांच्या किमती कमी-जास्त होऊ शकतात. मात्र, दीर्घ मुदतीचा विचार करता, घराच्या किमतीचा "ट्रेंड' हा कायम वरच्या दिशेलाच असतो.

घर घेण्याला आपलं सर्वोच्च प्राधान्य असतं. ते लवकरात लवकर घेतलं, तर तुमचं हे सर्वांत मोठं उद्दिष्ट खूप लवकर पूर्ण होईल आणि तुम्ही "रिलॅक्‍स' व्हाल.

आणखी एक, तुम्हाला कुठं तरी राहावं लागणारच. त्यामुळे तुम्हाला किमान भाडं तरी द्यावं लागेलच. स्वतःचं घर असेल तर तुमचे भाड्याचे पैसे वाचतील. भाडं दिल्यावर तुम्हाला राहायला मिळेल हे खरं असलं, तरी हे पैसे एकदा गेले की गेले. कर्जाच्या मासिक हप्त्यासाठी (ईएमआय) कदाचित भाड्यापेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील; पण त्यातून एक महत्त्वाची "ऍसेट' तयार होत असते, हे लक्षात घ्या. सुरवातीला मोठा हप्ता भरताना तुमची तारांबळ उडेल, यात काही वाद नाही; पण हळूहळू तुमचं उत्पन्न वाढत जाईल आणि हप्ता मात्र तोच राहील. गृहकर्जाची मुदत साधारणपणे दहा-पंधरा वर्षांच्या पुढे असते, त्यामुळे तुमच्या उत्पन्नातील ईएमआयची टक्केवारी हळूहळू बदलत जाईल आणि थोड्या वर्षांनी ही रक्कमसुद्धा किरकोळ वाटेल.

तरुणपणात खर्च मर्यादित असतात. तुम्हाला मुलांचं शिक्षण, त्यांची लग्नं वगैरेची काळजी करायची नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पन्नातला जास्त हिस्सा कर्जाच्या हप्त्यासाठी देऊ शकता. लवकर घर घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुमची "कंपल्सरी' बचत होते. दर महिन्याला ईएमआय भरणं म्हणजे एक प्रकारची बचत असते. कारण एरवी हे पैसे तुम्ही तात्कालिक कारणांसाठी खर्च करून टाकता, बरोबर ना? तुमच्याकडे घरासाठी सगळी रक्कम असणंही गरजेचं नाही. बॅंकांकडून हल्ली अगदी सहजपणे गृहकर्ज मिळू शकतं. तेव्हा मग, वाट कशाची बघताय? सुरू करा घरांचं संशोधन!
(लेखक पर्सनल फायनान्स विषयातील तज्ज्ञ आहेत.)

लक्षात ठेवा
  • तरुणपणात खर्च मर्यादित असतात.
  • बॅंकांकडून सहजपणे गृहकर्ज मिळू शकतं.
  • मासिक हप्त्यामुळे "कंपल्सरी' बचत होईल.
  • उद्दिष्ट लवकर पूर्ण झाल्याने "रिलॅक्‍स' व्हाल.
  • महत्त्वाची "ऍसेट' तयार होते.
  • घराचं मूल्य दिवसेंदिवस वाढतच जातं.

blog comments powered by Disqus