नव्या संकल्पनेचा 'प्रवेश'

- समीर कामत.


समीर कामत आणि स्वप्निल धर्माधिकारी यांनी उच्च शिक्षणानंतर पारंपरिक नोकरीचा मार्ग सोडून एका वेगळ्याच क्षेत्रात प्रवेश केला आहे. प्रवेशापासून स्पर्धा परीक्षांपर्यंत मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या वेबसाइट्‌स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. त्यांच्या वाटचालीविषयी.

आ ज भारताची संगणकप्रणाली विकसित करणारी बाजारपेठ ही 70 अब्ज अमेरिकी डॉलर आहे. पण शिक्षण क्षेत्रासंबंधित आणि विशेषतः शिक्षण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूपच कमी प्रयत्न झाले आहेत. या बाजारपेठेत खूप काही करण्यासारखं आहे, असं प्रथम स्वप्निल धर्माधिकारीला आणि नंतर त्याचा मार्गदर्शक म्हणून काम करता करता सहसंस्थापक झालेल्या मलाही जाणवलं.

आज प्लेग्रुपपासून पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कोणत्याही कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठीची परिस्थिती बिकट आहे. फक्त विद्यार्थीच नाहीत, तर त्यांचे पालक आणि आज जो नवा वर्ग शिक्षणाकडे ओढला जात आहे ते वर्किंग एक्‍झिक्‍युटिव्हजदेखील यात भरडले जात आहेत. चांगल्या संस्थांना प्रवेशाच्या व्यवस्थापनाचा प्रश्‍न, तर नव्याने आलेल्या संस्थांना त्यांच्या मार्केटिंगचा प्रश्‍न सतावत आहेत. शिक्षण हा न संपणारा प्रवास आहेच. आधी शालेय शिक्षण त्यात स्पर्धा परीक्षांची आवाहने नंतर निवडलेल्या मार्गाने पदवी मिळाली आणि नोकरी लागली, की तिकडच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता सततच्या प्रशिक्षणांची गरज. अशा या एज्युकेशन लाइफसायकलमध्ये सर्वांना मदत करून कार्यभाग सोपा व्हावा हेच  www.epravesh.com चे ध्येय आहे. आणि त्याकरिता फक्त प्रवेशच नाही, तर पुस्तके  (www.bookshelf.co.in)  आणि स्पर्धा परीक्षांची तयारी  (www.eklavvya.in) आणि खेड्यापाड्यांमध्ये पोचण्याकरिता इंटरनेटचे माध्यम वापरण्याचा प्रयत्न चालू आहे.

आज अजूनही आमच्या उद्दिष्टांच्या जवळपासही नाही आहोत; पण आतापर्यंतचा प्रवासदेखील काही कमी चॅलेंजिंग नव्हता. स्वप्निल एस. पी. जैनमधून एमबीए करून बाहेर पडत होता तेव्हा त्याच्या हातात नोकरीची ऑफर होती. पण लहान भावाने दिलेल्या मदतीच्या हातामुळे आणि स्वत:च्या प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने ही मोठी उडी घेतली. माझ्या बाबतीत तर नोकरी सोडण्याचा निर्णय हा धाडसीच होता. एक मुलगी सात आणि दुसरी दोन वर्षांची, अशा परिस्थितीत गलेलठ्ठ पगाराची डिरेक्‍टर लेव्हलची पोझिशन सोडून हे उद्योजक बनायचं ठरवलं होते. संसारिक जबाबदाऱ्या आणि वाढत्या महागाईचा सामना महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये करणं हे नक्कीच साधं काम नव्हतं. पण दोघांनी जिद्द सोडली नाही आणि घरच्यांनीही त्यांना खरंच चांगली साथ दिली. ET Power Of ldeas  ध्ये जेव्हा देशभरातल्या 17000 चमकदार ldeas प्रवेश कामची पहिल्या 35 बेस्ट आयडियाजमध्ये गणना झाली आणि नारायण मूर्ती यांच्या हस्ते सत्कार झाला तेव्हा सगळं भरून पावल्याची भावना होती. प्रवासात कित्येक नैराश्‍याचे क्षण आलेच आले. व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाशी व्यवहार करताना त्या व्यावसायिक असतीलच हा जो समाज होता तो पदोपदी खोटा ठरला. पण प्रत्येक नवा अनुभव बरोबर घेऊन वाटचाल चालू होती. आणि राठी स्ट्रॅटेजिक व्हेंचरच्या रूपानं विश्‍वास दाखवून अर्थ साहाय्य करणारी संस्था पण मिळाली. आता काम अजून जोमानं करायचं आहे, हाच आमचा ध्यास आहे. जिद्द सोडू नका, स्वत:वरती, स्वतःच्या संकल्पवरती दृढ निष्ठा ठेवा. एक गोष्टीची मनाशी नक्की खूणगाठ बांधा की भारत नक्कीच बदलतो आहे, पण तुमच्या आजूबाजूचे, समाज अजून नक्कीच बदलायचा आहे. उद्योजकांना जेवढा आत्मसन्मान, साह्य परदेशात आहे, ते अजून आपल्या भारतात यायचं आहे.

तुमच्या उद्योगात येणाऱ्या गुंतवणुकीला ती कुठल्या वेळेस होत आहे त्याला महत्त्व द्या. तुमची संकल्पना जगापर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. ती चांगली संकल्पना असेल आणि तिची अंमलबजवणी व्यवस्थित झाली तर तिचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. अनेक मदतीचे हात आपोआपच पुढे येतील. शेवटची गोड; पण खूप आवश्‍यक- आपण समाजच काही तरी देणं लागतो ही भावनादेखील ठेवा आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हात पुढे करा... मदतीचा.


blog comments powered by Disqus