जुनी 'एफडी' मोडून नवीन करावी का?

राग वामदत्त
गेल्या काही महिन्यांत बॅंकांतील मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदर वाढले आहेत. त्यामुळे कमी व्याजदराच्या जुन्या एफडी मोडून त्यांचे नूतनीकरण करावे का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येतो. त्याबाबत काय करावे याविषयी...

सु मारे दोन वर्षांपूर्वी बॅंकांच्या मुदत ठेवींचे (एफडी) व्याजदर अगदी सहा-सात टक्‍क्‍यांपर्यंत आले होते. पण त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होत जाऊन आज बॅंकांचे व्याजदर 10 टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहेत. अशा वेळी साहजिकच जुनी एफडी मोडून तिचे नव्या व्याजदरात नूतनीकरण करावे, असा विचार अनेकांच्या मनात येतो. पण जुनी एफडी मोडून नवीन एफडी करताना केवळ नवीन व्याजदराचा विचार करून चालणार नाही. तुम्हाला बसणाऱ्या पेनल्टीचाही विचार करावा लागेल.

सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे मुदतीपूर्वी एफडी मोडली तर तुम्हाला कमी दराने व्याज मिळेल. एफडी मध्येच मोडताना मूळ मुदतीसाठीच्या दराने नव्हे, तर तुम्ही एफडी मोडता त्या मुदतीसाठीचा म्हणजे कमी व्याजदर तुम्हाला मिळेल. उदाहरणार्थ, एखादी एफडी चार वर्षांची असून त्यासाठी आठ टक्के व्याजदर आहे. मात्र, तुम्ही ही एफडी दोन वर्षांनंतरच मोडली, तर तुम्हाला दोन वर्षे मुदतीसाठीचाच व्याजदर मिळेल. तुम्ही एफडी केलीत तेव्हा दोन वर्षे मुदतीसाठी व्याजदर सव्वासात टक्के असेल, तर तुम्हाला हाच व्याजदर लागू होईल. त्यामुळे तुम्हाला दोन वर्षांचे आठ टक्के दराने नव्हे, तर सव्वासात टक्के दराने व्याज मिळेल.

अर्थात तुमचा हा तोटा इथेच संपणार नाही. तुम्ही एफडी मध्येच मोडल्याने बॅंक तुम्हाला पेनल्टी म्हणून तुमच्या व्याजदरात आणखी थोडी कपात करील. ही कपात अर्धा ते एक टक्‍क्‍याची असू शकते. आता वरील उदाहरणातील बॅंकेने समजा ही पेनल्टी एक टक्का बसवली, तर तुम्हाला लागू होणारा व्याजदर सव्वासात वजा एक म्हणजे सव्वासहा टक्के इतकाच असेल. काही बॅंका ही पेनल्टी माफही करतात; पण त्याची काही विशिष्ट अशी व्याख्या नसते. त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करूनच एफडी मोडा. अर्थात काही वेळा एफडी मोडून नवीन एफडी करणे ही गोष्ट तुमच्या फायद्याचीही असते. तुम्ही एफडी करून कमी काळ उलटला असेल, तर नवीन एफडी करणे फायद्याचेही ठरू शकते.

एफडी मोडणे कधी फायदेशीर ठरू शकते, याची दोन उदाहरणे शेजारी दिली आहेत. त्यात किचकटपणा टाळण्यासाठी चक्रवाढ व्याजदर गृहीत धरलेला नाही. ही दोन्ही उदाहरणे लक्षात घेतली, तर एफडी जुनी असेल तर ती मोडणे फारसे फायदेशीर ठरत नाही; मात्र ती नवीन असेल तर नव्या, वाढीव व्याजदराचा फायदा मिळू शकतो, हे लक्षात येईल. अशाच प्रकारे तुमच्या एफडीला प्रत्यक्ष किती व्याज मिळणार याची आकडेमोड करा आणि मगच निर्णय घ्या.

  • एफडी मोडणे कधी फायदेशीर?
    एफडी चार वर्षे ठेवल्याने मिळणारा व्याजदर आणि मिळणारे व्याज
    8 % (32,000)
  • एफडी दोन वर्षांनंतर मोडल्याने मिळणारा व्याजदर आणि मिळणारे व्याज
    6.25 % (12,500)
  • नवीन एफडी दोन वर्षे मुदतीसाठी ठेवल्याने मिळणारा व्याजदर आणि व्याज
    9% (18,000)
  • चार वर्षांतील एकूण व्याज
    30,500
  • एफडी चार वर्षे ठेवल्याने मिळणारा व्याजदर आणि मिळणारे व्याज
    8 % (32,000)
  • एफडी सहा महिन्यांनंतर मोडल्याने मिळणारा व्याजदर आणि मिळणारे व्याज
    5.5 % (2,750)
  • नवीन एफडी साडेतीन वर्षे मुदतीसाठी ठेवल्याने मिळणारा व्याजदर आणि व्याज
    9 % (31,500)
  • चार वर्षांतील एकूण व्याज
    34,250
blog comments powered by Disqus