हम में है दम

वसुंधरा काशीकर-भागवत
vasundhara.kashikar@esakal.com

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या सीडीएस (कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्‍झाम) परीक्षेच्या निकालात भारतीय सैन्य दलांच्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन वूमन नॉन टेक्‍निकलसाठी संपूर्ण भारतातून 18 तरुणींची निवड झालीय. ज्यामध्ये पुण्याची 24 वर्षांची मानसी गजेंद्रगडकर आणि 22 वर्षांची ईशिता सूद या तरुणींनी गौरवास्पद यश मिळवलंय. यांची नियुक्ती आता लेफ्टनंट म्हणून झालीय. चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमीमध्ये या दोघी आता ट्रेनिंगसाठी जाणार आहेत. यानिमित्ताने मानसी आणि ईशिताशी आम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी इशिता आणि मानसीचा चेहरा एकच गोष्ट बोलत होता आणि ती म्हणजे यस! वुई हॅव इट...

मानसी सांगत होती, ""तिचे वडील हे शिरीष गजेंद्रगडकर आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळे आर्मीचं बॅकराऊंड होतंच. एकदा लहानपणी मी वडिलांचा युनिफॉर्म घातला आणि तो मला खूप लांब, ढगळ ढगळ असा झाला, तर त्या वेळी वडील म्हणाले, की तू आर्मी जॉइन कर आणि मग तुझ्या मापाचा युनिफॉर्म तुला मिळेल. तेव्हा मी चार वर्षांची होते. तेव्हापासूनच कुठेतरी हा विचार रुजला, की आपण आर्मीत जायचं. त्यानंतर जसजशी मोठी होत गेले तसं आर्मी सर्व्हिसचं आकर्षण वाटायला लागलं. आर्मीची जीवनशैली, त्यातलं आव्हान, देशासाठी सेवा करण्याची संधी, एकूणच मुलींचं कमी असलेलं प्रमाण या सगळ्याच गोष्टी खुणावत होत्या.''

2003 मध्ये अचानक आमच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. माझे वडील शिरीष अचानक कार्डिऍक अरेस्टने गेले. आम्ही सगळेच आतून हलून गेलो होतो. मी त्या वेळी 12 वीत होते. त्याच वेळी माझा पक्का निर्णय झाला, की आपण सीडीएस करायचं. आई खूपच हळवी झाली होती. सुरवातीला तिने माझ्या निर्णयाला विरोध केला. ""तू इतक्‍या दूर जाशील, मग माझं काय होईल?'' असं सारखं ती बोलत असे. पण सोबतच हेही सांगायला हवं, की अनेक नातेवाईक बाबा गेल्यावर माझं लग्न करा म्हणून मागे लागले असताना तिने त्याला ठाम विरोध केला. मी लग्नापूर्वी आपल्या पायावर उभं राहायलाच हवं, असं तिचं ठाम मत होतं. शेवटी तिने माझ्या निर्णयाला मान्यता दिली. पण एक अट घातली, की मी पहिल्या प्रयत्नातच सीडीएस व्हायला पाहिजे.

वडील गेल्यावर मी माझं बी.कॉम. पूर्ण केलं. मध्ये एक वर्ष रेडिओ जॉकीची नोकरी केली. त्या नोकरीत मला खूप शिकायला मिळालं. लोकांचे स्वभाव कळले. तो माझ्यासाठी एक ग्रोइंग एक्‍सपिरिअन्स होता.

2009 मध्ये नोव्हेंबरमध्ये फॉर्म भरल्यावर मी खऱ्या अर्थाने तयारीला सुरवात केली. बाजारात सीडीएस (कंबाइंड डिफेन्स सर्व्हिस एक्‍साम) ची अनेक पुस्तकं मिळतात. ती पुस्तकं घेऊन मी अभ्यास सुरू केला. मला वाचनाची सवय नाही, त्यामुळे सुरवातीला वाचनाची सवय लावून घ्यावी लागली. आफ्रिकेत बाबांसोबत राहायला गेल्याने माझं बोली भाषेतलं इंग्लिश चांगलं झालं होतं. माझं असं मत आहे, की एखाद्याने वीस दिवस रोज तीन तास जनरल नॉलेज आणि एक तास इंग्लिश अशी तयारी केली तर लेखी परीक्षा पास होणं काही कठीण नाही.

मानसी आणि ईशिता, दोघींनीही इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग अपेक्‍स करिअर्स, पुणे इथे लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (रिटायर्ड), कमांडर प्रदीपकुमार बॅनर्जी ( रिटायर्ड) आणि प्रा. हृषीकेश आपटे यांच्याकडून घेतलं.

इंटरव्ह्यूला सामोरं जाताना -
लेखी परीक्षेनंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखतीचा. ही मुलाखत पाच दिवस चालते. पहिल्या दिवशीच स्क्रिनिंग होतं. त्यात जे निवडले जातात त्यांची मग पुढचे पाच दिवस वेगवेगळ्या कसोट्यांवर परीक्षा घेतली जाते. यात ग्रुप डिस्कशन, उत्स्फूर्त भाषण, सायकॉलॉजी टेस्ट, काही शारीरिक कसरती अशा गोष्टींचा समावेश असतो. या सगळ्यांमधून त्यांना तुमचा ऍटिट्यूड, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन तपासायचा असतो, की तुमच्यात ऑफिसर लाईक क्वालिटीज आहेत का? तुम्ही चुकलात, तुम्हाला एखादी गोष्ट जमली नाही तरी चालेल, पण तुमचे प्रामाणिक प्रयत्न त्यांना दिसायला हवेत. आपल्या चुका ग्रेसफुली मान्य करणं महत्त्वाचं.

ईशिताचं बॅकग्राऊंड तर अगदीच वेगळं होतं. ईशिता ही मूळची सिमल्याची. बायो-टेक्‍नॉलॉजीमध्ये तिने बी. टेक. केलंय. ती हिंजवडीला विप्रो कंपनीत प्रोजेक्‍ट मॅनेजर म्हणून काम करतेय. विप्रोसारख्या नामांकित कंपनीतली मोठ्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय ईशिताने घेतला. त्याबद्दल तिला विचारलं असता ती म्हणाली, ""माझे वडील इंजिनिअर आणि आई प्राध्यापिका. लहानपणापासूनचं स्वप्न होतं, की आपण आर्मीत जायचं. माझे आजोबा आर्मीत होते. ती जीवनशैली मला खूप आवडते. त्यात खूप एनर्जी आहे, जिवंतपणा आहे, ऍक्‍टिव्हिटी आहे असं मला वाटतं. आणि पैसा महत्त्वाचा आहे हे नक्की, पण पैशासोबत मला रिस्पेक्‍ट खूप महत्त्वाचा वाटतो. सॉफ्टवेअरमध्ये मी अनेकांमधली एक होऊन राहणार होते. इथे मात्र मुलींचं येण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. या सेवेत काम करून मिळणारा आदरही खूप महत्त्वाचा आहे. दिवसभर कॉंप्युटरसमोर बसून काम करणं मला आवडत नव्हतं. मला कोणतं आयुष्य जगायचं आहे, हे सुदैवाने लवकर कळलं, आणि त्याप्रमाणे मी निर्णय घेतला.

""लेखी परीक्षा पास झाल्यावर इंटरव्ह्यूला जाताना माझ्या अंगात 102 ताप होता. तिथे पोचले तेव्हा तीन दिवस अँटिबायोटिक्‍स घेत होते. पण माणसाच्या मनाची क्षमता अफाट आहे. माझा निर्धार होता, की काहीही झालं तरी हे आपण करायचंच. सिलेक्‍शन झाल्यावर मेडिकल टेस्टमध्ये माझं वजन 13 किलोंनी जास्त भरलं. त्यांनी मला महिन्याभराची वेळ दिली होती. एक महिन्यात जीम, स्विमिंग, डाएटिंग अशा सर्व प्रकारांचा वापर करून मी माझं वजन 11 किलोंनी उतरवलं. जर यदाकदाचित माझं सिलेक्‍शन झालंच नसतं तर मी विप्रो सोडून लहान मुलांसाठी काम करणारी एखादी एनजीओ जॉइन करण्याचा विचार केला होता. माझ्या रिटायरमेंटनंतरही मी असंच एखादं काम करणार आहे.''

मानसी आणि ईशिता या दोघींनाही भेटल्यावर हेच जाणवलं, की मुली आता स्वतंत्रपणे आपल्या आयुष्याचा विचार करू लागल्या आहेत. मला माझं आयुष्य कसं जगायचंय, हे ठरवू लागल्या आहेत. स्वातंत्र्याचे हळूहळू पडू लागलेले हे कवडसे खरंच सुंदर आहेत. एका काश्‍मिरी कवयित्रीच्या कवितेची मला आठवण झाली. ती म्हणते, न मैं साया हूँ, न हूँ अक्‍स, मैं मैं हूँ, तू नहीं... ईशिता आणि मानसी हेच तर सांगतायत.


 
Untitled Page